सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे विद्यार्थी विकास विभागाच्या युवतीसभा अंतर्गत सहा दिवसीय ‘अग्निवीर व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळे’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी कर्नल अनुज (ए.आर.ओ, छत्रपती संभाजीनगर) यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अग्निवीर योजना ही तरुणांसाठी आणि देशासाठी अत्यंत लाभदायी आहे. त्यांनी अधिकाधिक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, तसेच शारीरिक, मानसिक आणि लेखी परीक्षांची तयारी करून देशसेवेसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे, प्रा. अचल भोगे, डॉ. जयश्री पाटील, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, प्रा. शिवाजी मगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी कर्नल अनुज आणि सुभेदार मेजर समाधान यांनी विद्यार्थ्यांना ‘जॉईन इंडियन आर्मी’ या अधिकृत वेबसाईटचा योग्य वापर करून भरतीसंबंधी अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन केले. तसेच, एनसीसी प्रमाणपत्राचा लाभ, शारीरिक क्षमता, मैदानी चाचणी, वैद्यकीय तपासणी आणि लेखी परीक्षेसाठी आवश्यक तयारी कशी करावी याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या पुढील पाच दिवसांत १८ महाराष्ट्र बटालियन, एनसीसी, जळगावचे प्रशासकीय अधिकारी कर्नल अश्विन वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय. स्टाफ तर्फे शारीरिक प्रशिक्षण, कवायती आणि ड्रिल यावर विशेष सत्रे घेतली जाणार आहेत.
तसेच, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे विशेष मार्गदर्शन सत्रे होणार आहेत –
१८ फेब्रुवारी – मेजर डॉ. स्मिता चौधरी
१९ फेब्रुवारी – माजी बीएसएफ अधिकारी युवराज गाढे
२० फेब्रुवारी – विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक आकाश तायडे
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत आणि प्रा. शिवाजी मगर यांचे विशेष सहकार्य लाभले. १७ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ही कार्यशाळा होणार असून, इच्छुक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे व कार्यशाळेचे संयोजक डॉ. विजय सोनजे यांनी केले आहे.