मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचण्यास सुरुवात केली आहे. केवळ तीन दिवसांतच या चित्रपटाने विक्रमांची मालिका तयार करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘छावा’च्या अद्भुत कामगिरीचा विक्की कौशलनाही अंदाज नसेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
चित्रपटाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी ‘छावा’ने 33.1 कोटी रुपये कमावले, तर दुसऱ्या दिवशी हा आकडा 39.30 कोटींवर पोहोचला. तिसऱ्या दिवशी जबरदस्त वाढ दिसून आली आणि तब्बल 49.50 कोटींची कमाई करत एकूण कलेक्शन 121.9 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले.
‘छावा’ने विक्की कौशलच्या एकूण 11 चित्रपटांपैकी 10 चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकले आहे. फक्त ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ (245.36 कोटी रुपये) या चित्रपटाचा विक्रम मोडणे बाकी आहे. विशेष म्हणजे, ‘छावा’ विक्की कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग आणि विकेंड कमाई करणारी फिल्म ठरली आहे. या चित्रपटाच्या वेगाने पाहता, तो 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असे जाणकारांचे मत आहे.
‘छावा’ मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला असून, लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने केवळ तीन दिवसांतच आपला खर्च वसूल केला आहे. विक्की कौशलसोबत रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह यांसारखे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. चित्रपटाच्या जबरदस्त प्रतिसादावरून हा सिनेमा अजून किती विक्रम मोडेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.