नेरीनाक्याजवळील फर्निचर दुकानाला भीषण आग; चार बंबांनी विझविली आग (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । नेरी नाका स्मशानभूमी समोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या जुन्या फर्निचर दुकानाच्या गोडावूनला आज सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत दुकानातील सर्व वस्तू जळून पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले आहे. ही आग चार अग्निशमन बंबाने विझाविण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, दस्तगीर शहा रज्जाक शहा रा. सलार नगर यांचे नेरीनाका स्मशानाभूमीजवळ असलेल्या मुख्य रस्त्यावर जुने फर्निचर दुकानाचे गोडावून आहे. गोडावूनमध्ये जुन्यावस्तूत खुर्ची, खिडक्या, दरवाजे, फ्रिज, फर्निचर आदी वस्तू ठेवून विक्रीचा व्यवसाय करतात. आज गुरूवार सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागल्याने सर्व वस्तू जळून खाक झालेले आहेत. आग लागल्याचे नेमके कारण कळू शकले नाही.  आग लागताच काही मिनीटांमध्ये महापालिकेचे अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. चार बंबांनी ही आग विझविण्यात आली आहे. 

आग लागल्याची माहिती मिळताच महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोडावून मालकाशी संवाद साधून माहिती जाणून घेतली. दरम्यान, शासनाच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन दिले. घटनेचा पंचनामा करण्यासाठी मंडळाधिकारी योगेश नन्नवरे यांनी आगीचा पंचनामा केला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.