मुंबईत निवासी इमारतीला भीषण आग : तिघे अत्यवस्थ

fire in building

मुंबई, प्रतिनिधी | चर्नी रोड येथील ड्रीमलँड सिनेमाजवळ एका निवासी इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. त्यात तिघे जण गुदमरले असून त्यातील एक जण जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. इमारतीत अनेकजण अडकल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

 

तत्पूर्वी, आग लागलेल्या इमारतीत सात ते आठ जण अडकल्याचे सुरुवातीला सांगण्यात येत होते. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. काही वेळाने अग्निशमन बंब आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतलं. काही कर्मचाऱ्यांनी क्रेन आणि शिडीच्या मदतीनं इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढले. दरम्यान, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एक व्यक्ती बेपत्ता झाली होती. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर पडत होते. याशिवाय मजल्यावर आगीमुळे कमालीची उष्णता होती. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या मदतीने मजल्यावर प्रवेश केला. ती व्यक्ती चौथ्या मजल्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली. त्या व्यक्तीला जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. दरम्यान, आगीमुळे सगळीकडे धूर पसरला होता. अजूनही बचावकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

Protected Content