आमोद्यात मंदिराला भीषण आग; जिल्हा बँकेच्या शाखेचेही नुकसान

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आमोदे येथील श्रीराम मंदिराला काल रात्री भीषण आज लागली असून यात मोठे नुकसान झाले असले तर मूर्त्या सुरक्षित राहिल्या. तसेच येथे असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे.

आमोदे, ता. यावल येथील श्रीराम मंदिराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या जेडीसीसी बँकेच्या शाखेत शॉर्टसर्किट मुळे आग लागून मंदिराचा उत्तरेकडील अर्धा भाग जळून खाग झाला आहे. ही आग रात्री साडेदहा च्या सुमारास लागून रात्री तीन वाजता पूर्णपणे विझवण्यात आली. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. बँकेचे फर्निचर, कागदपत्र सर्व जळून खाक झाले असले तरी रोकड सुरक्षित राहिली.

दरम्यान, पुरातन, तीन मजली सागवानी लाकडाचा ढाचा असलेले मजबूत बांधकामाचे मंदिर असल्याने उत्तरेकडील व वरील दोन मजल्यांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. मंदिराच्या दक्षिणेकडील तळमजल्याचा काही भाग सुरक्षित आहे. मंदिराच्या वर असलेला झेंडा आणि गाभर्‍यात विराजमान श्रीराम, लक्ष्मण, सीतामाईसह इतर देवता सुरक्षित राहिल्या.

रात्री आगीची माहिती मिळताच फैजपूर सावदा भुसावळ यावल रावेर येथील अग्निशमन बंबानी आता प्रयत्न करून आग विझविली. फैजपूर, सावदा, हिंगोना, न्हावी, बामणोद, पाडळसा, भालोद, भुसावळ येथील राजकीय सामाजिक पदाधिकार्‍यांसह असंख्य कार्यकर्ते आमोदयात धावून आले. गावात झालेले मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अत्यंत अडचणी निर्माण झाल्या. मंदिरासमोरील एकाच दिशेने अग्निशमन बंब येऊन परत रिव्हर्स घ्यावे लागत होते. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यास उशीर लागत होता. शासकीय कर्मचारी तलाठी, ग्रामसेवक, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी स्थानिक रहिवास नसल्याने नागरिकांचा संताप झाला.

जेडीसीसी बँकेचे आज पासून दूध फेडरेशन डेअरी मध्ये स्थलांतर करण्यात आले असून आज अकरा वाजेपासून बँकेचे कामकाज सुरळीत सुरू राहील असे बँकेच्या मुख्य अधिकार्‍यांनी सांगितले. बँकेचे कामकाज ऑनलाईन असल्याने संपूर्ण डाटा सुरक्षित असल्याने खातेदारांनी चिंता करू नये. बँकेचे लॉकर तळमजल्यावर असल्याने संपूर्ण रक्कम सुरक्षित असल्याचे बँकेचे शाखाधिकारी जावळे यांनी सांगितले. या भीषण आगीमुळे आमोदेसह परिसरातील लोक रात्रभर जागी होते.

Protected Content