Home Uncategorized जळगावात श्वानांसाठी ‘फीडिंग झोन’ निश्चित; मनपाचा महत्त्वाचा निर्णय

जळगावात श्वानांसाठी ‘फीडिंग झोन’ निश्चित; मनपाचा महत्त्वाचा निर्णय


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भटक्या श्वानांना नियोजित पद्धतीने अन्न देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने शहरात ठराविक ‘श्वान फीडिंग झोन’ (खाद्य केंद्र) कायमस्वरूपी निश्चित केले आहेत. यासंदर्भातील अधिकृत सूचना मनपाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या (Animal Welfare Board of India) मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच Animal Birth Control (ABC) Rules, 2023 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांनुसार रस्त्यावरील श्वानांना अन्न देणे दंडनीय गुन्हा नसून ते नियोजित ठिकाणीच देणे अपेक्षित आहे.

मनपाने यापूर्वी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रस्तावित फीडिंग झोनची यादी प्रसिद्ध करून नागरिक व प्राणिप्रेमींकडून हरकत व सूचना मागविल्या होत्या. मात्र, याबाबत कोणतीही हरकत किंवा तक्रार प्राप्त न झाल्याने आता हे फीडिंग झोन कायमस्वरूपी निश्चित करण्यात आले आहेत.

शहरातील विविध प्रभागांमध्ये एकूण आठ ठिकाणी हे फीडिंग झोन निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये शिवाजीनगर, सागरनगर, मेहरूण, खंडेरावनगर आणि समतानगर परिसरांचा समावेश आहे. या ठिकाणीच भटक्या श्वानांना अन्न देण्याचे आवाहन मनपाने नागरिकांना केले आहे.

मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी नागरिकांनी नियमांचे पालन करून श्वानांना केवळ निश्चित फीडिंग झोनमध्येच अन्न द्यावे, असे आवाहन केले आहे. तसेच यामुळे शहरातील स्वच्छता राखण्यास व नागरिक-प्राण्यांमधील समन्वय वाढण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


Protected Content

Play sound