नगर-कल्याण मार्गावर पिकअपचा भीषण अपघात; पाच वर्षाच्या मुलीचा दुदैवी अंत

अहमदनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अहमदनगरमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. नगर- कल्याण रोडवर पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कर्जुले जवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की पिकअप थेट खड्यात उलटला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या अपघातात पिकअपचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर- कल्याण रोडवर शनिवारी पहाटे साडे पाच वाजता भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअपमधील सर्व प्रवासी हे बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे सर्व जण मंचरहून पारनेरकडे यात्रेसाठी निघाल्याचेही सांगण्यात येत आहे.

Protected Content