जिंतूर-सोलापूर मार्गावर बसचा भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी

परभणी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | परभणी जिल्ह्यातील जिंतूर-सोलापूर जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात अकोली पुलाजवळ झाला आहे. बस थेट पुलावरून खाली दरीत कोसळली आहे. या बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, स्थानिक नागरिक देखील मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व जखमींना तात्काळ जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व जखमी प्रवाश्यांचे जिंतूर ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बसचा अकोली पुलाजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. जिंतूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोली पुलावरून जात असताना हा अपघात घडला. वाहन चालकाचा बसवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरून बस तब्बल ५० फूट खोल नदीपत्रात कोसळली. ही बस सकाळच्या सुमारास सोलापूरकडे निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले होते. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील अकोली नदीवरील पूल अपघाताचा केंद्र बनला आहे. कारण मागील काही वर्षात याठिकाणी सतत अपघाताच्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, आज पुन्हा असाच अपघात समोर आला.

Protected Content