Home क्राईम नशिराबादेतील ६ सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार 

नशिराबादेतील ६ सराईत गुन्हेगार वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार 

0
7


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात पोलीस प्रशासनाने मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव विभाग यांनी दिलेल्या आदेशानुसार नशिराबाद येथील सहा सराईत गुन्हेगारांना तब्बल एक वर्षाच्या कालावधीसाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपार करण्यात आलेल्या इसमांमध्ये अताउल्ला अमानुल्ला शहा, मुकतार शहा खलील शहा, अक्रम शहा सादिक शहा, रोहित दिलीप नाथ, विपुल गोविंदा नाथ आणि आवेश उर्फ काल्या शेख जहांगीर यांचा समावेश आहे. हे सर्व जण नशिराबाद, ता. जि. जळगाव येथील रहिवासी आहेत. पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, संबंधित इसमांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्या वारंवारच्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेसमोर आव्हान निर्माण झाले होते. त्यांच्या हालचालींवर प्रतिबंध आणून परिसरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने नशिराबाद पोलीस ठाण्याच्या वतीने हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर सुनावणी घेण्यात आल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी संबंधित सहा जणांना एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश पारित केले. या कारवाईमुळे नशिराबाद परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यास मदत होणार असून, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हद्दपारीच्या कालावधीत संबंधितांनी आदेशाचे उल्लंघन करून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जळगाव जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच अशा परिस्थितीत त्यांना अटक केली जाऊ शकते, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस अंमलदार पोहेका गुणवंत देशमुख, पोहेका चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल भरत बाविस्कर आणि पोलीस कॉन्स्टेबल पंकज सोनवणे यांनी हद्दपारीची कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.


Protected Content

Play sound