


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील प्रस्तावित अतिक्रमण हटाव कारवाईला तूर्तास मुदतवाढ देण्यात आली असून, संबंधित अतिक्रमणधारकांना २५ सप्टेंबर २०२६पर्यंत स्वतःहून अतिक्रमण हटविण्याची संधी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि यावल नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित असलेल्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा छायाताई पाटील आणि नगरसेवक अतुल पाटील यांच्या मध्यस्थीने प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली. सणासुदीचे दिवस, व्यापाऱ्यांची गैरसोय आणि पोलिसांवरील बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
अतिक्रमण कारवाईची तयारी सुरू झाल्यानंतर संबंधित अतिक्रमणधारकांनी नगराध्यक्षा छायाताई पाटील आणि नगरसेवक अतुल पाटील यांची भेट घेतली. अतिक्रमण काढण्यास आपली तयारी असून, ते स्वतःहून काढण्यात येईल; मात्र सध्या पोळा तसेच त्यानंतर गणेशोत्सव हे महत्त्वाचे सण असल्याने काही दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. अतिक्रमणधारकांची भूमिका लक्षात घेऊन नगराध्यक्षा छायाताई पाटील आणि नगरसेवक अतुल पाटील यांनी प्रशासनाशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. यानंतर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, यावल नगरपालिकेचे कार्यालयीन प्रमुख विशाल काळे, बांधकाम अभियंता संग्राम शेळके, कर निरीक्षक कोल्हे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सध्याची सणासुदीची परिस्थिती, नागरिकांची संभाव्य गैरसोय, व्यापाऱ्यांनी सणासाठी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला माल तसेच सणांच्या काळात पोलिसांवर येणारी अतिरिक्त बंदोबस्ताची जबाबदारी या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. या सर्व परिस्थितीचा विचार करून ८ सप्टेंबर रोजी प्रस्तावित असलेली अतिक्रमण हटाव कारवाई २५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नगरसेवक अतुल पाटील यांनी अतिक्रमणधारकांची बाजू मांडताना सणासुदीच्या काळात कारवाई केल्यास व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होऊ शकते, असे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. अनेक व्यापाऱ्यांनी सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात माल भरून ठेवला आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांवर बंदोबस्ताची अतिरिक्त जबाबदारी असते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अतिक्रमण कारवाईमुळे प्रशासन आणि पोलिसांवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ नये तसेच कोणतीही अनुचित परिस्थिती उद्भवू नये, यासाठी काही दिवसांची मुदत देणे योग्य ठरेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, अतिक्रमण कारवाई पूर्णपणे रद्द करण्यात आलेली नसून केवळ काही दिवसांची मुदत देण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. २५ सप्टेंबर २०२६नंतर प्रशासनाकडून नियमानुसार अतिक्रमण हटावाची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित अतिक्रमणधारकांनी या कालावधीचा उपयोग करून पर्यायी व्यवस्था करावी आणि आपले अतिक्रमण स्वतःहून काढून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक अतुल पाटील यांनी केले. नगराध्यक्षा छायाताई पाटील यांनीही नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रशासन, नगरपालिका आणि नागरिक यांच्यात समन्वय राहून कोणताही अनुचित प्रकार न घडता अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.



