भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन रिक्षाचालकांवर जीवघेणा हल्ला

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वे प्रवासात झालेल्या वादाचा राग मनात ठेवून चाळीसगाव रेल्वे स्टेशनच्या बाहेरील रिक्षा स्टॉपवर पाच जणांचा वाद सुरू होता. हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दोन रिक्षाचालकांवर चॉपर व फायटरने वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रेल्वे प्रवासात झालेल्या वादाचा राग मनात ठेवून सोमवारी १ एप्रिल रोजी मध्यरात्री १ वाजता चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या रिक्षा स्टॉपवर रिक्षा चालक किरण सिताराम गवळी यांच्या रिक्षा क्रमांक (एमएच १९ बीडब्ल्यू ४०८५) मध्ये तीन प्रवाशी आपापसात भांडण करून लागले. त्यावेळी रिक्षाचालक किरण गवळी आणि सोबतचे रिक्षाचालक संदीप अशोक चौधरी हे भांडण सोडविण्यासाठी गेल्याचा राग आल्याने प्रवाशी असलेले मयुर कोळी, अनिल रोहिदास मोरे, संया राजेंद्र ढालवाले, रविंद्र नाईक आणि सोन्या पुर्ण नाव माहित नाही यांनी चॉपर व फायटरने मारहाण केली. यामुळे दोन्ही रिक्षाचालक हे जखमी झाले आहे. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मंगळवारी २ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता चाळीसगाव शहर पोलीसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय महाजन हे करीत आहे.

Protected Content