ग्रामपंचायतीमधील अपहाराच्या चौकशीसाठी आमरण उपोषण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीत गेल्या तीन वर्षांपासून शासनाच्या निधीचा गैरवापर करून अपहार केल्याबाबत तक्रारींची कोणतीही दखल न घेतल्याने पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील यांनी यावल पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुयवात केली आहे. त्यांच्यासोबत गावातील ग्रामस्थ देखील आहेत.

 

यावल तालुक्यातील,सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीस आलेल्या वेगवेगळ्या निधीचा अनियमित उपयोग तसेच निधीचा अपहार करण्यात आल्याची तक्रार पंचायत समितीचे काँग्रेसचे माजी गटनेते शेखर पाटील यांनी येथील गटविकास अधिकारी यांचेकडे करत १४ ऑगस्ट पासून ग्रामस्थांसह मागण्या मान्य होईस्तोवर उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उपोषण काळात उपोषणकर्त्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असे ही पाटील यांनी म्हटले आहे.

 

उपोषणास बसलेल्या शेखर पाटील यांनी या प्रमुख मागण्यांकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले असुन, यात ग्रामपंचायत सावखेडा येथील सन २०२० पासून तर आज पर्यंत आलेल्या पंधराव्या वित्त आयोगातील कामाचे अनियमित टेंडर व अनियमित कामांची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करणे , तसेच ग्रामनिधी पाणीपुरवठा निधीमध्ये झालेल्या अपहारास कारणीभूत असलेल्यां वर तात्काळ कार्यवाही करणे, त्याचप्रमाणे एकाच ठेकेदारास बेकायदेशीर कामे दिल्याने दोषी असलेल्या ग्रामसेवकास निलंबित करण्यात यावे, अशा मागण्यांचा समावेश आहे.

 

आज १४ ऑगस्टपासून शेखर पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास सावखेडा सिम ग्रामपंचायतच्या सदस्य वर्षा अजय पाटील, नसीमा फारूक तडवी, रहीमान रमजान तडवी , सलीम मुसा तडवी , विनायक धना पाटील, शाहरूख राजु तडवी , निखिल खुशाल पाटील , समीर जुम्मा तडवी , दगेखा सिकंदर तडवी, भिकारी कालु तडवी यांनी ही उपोषणात सहभाग घेतला असुन , यावलचे प्रभारी माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, काँग्रेस कमेटीच्या अनुसुचित जाती विभागाचे तालुका अध्यक्ष अनिल जंजाळे ,काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान , राष्ट्रवादीचे अॅड देवकांत पाटील आदीनी आपला पाठींबा दर्शविला आहे .

Protected Content