शेतकऱ्यांनी शेतीचे शास्त्रज्ञ बनले पाहिजे : ना.गुलाबराव पाटील

ebf6d5c4 4179 475c 840c 98e368b29858

जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांनी शेतीकडे पारंपारिक धंदा नाही तर व्यवसाय म्हणून बघा .शेती एक शास्त्र असून शेतकरी हा शेतीचा शास्त्रज्ञ बनला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांची एकजूट महत्त्वाची आहे. लहान व मोठ्या शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस व ग्रींनहाऊस कडे वळण्याची गरज असून तरुण शेतकऱ्यांनी शेतीच्या नव्या संकल्पना नवे प्रयोग यशस्वी करून दाखवण्याची जिद्द बाळगावी असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग, आत्मा जळगाव आणि कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा नियोजन भवनात शेतकरी मेळावा तथा जिल्ह्यातील 16 उत्कृष्ट शेतकरी आणि 3 शेतकरी गटांच्या सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ना.गुलाबराव पाटील बोलत होते.

3 उत्कृष्ट शेतकरी गट 16 आदर्श शेतकऱ्यांचा सत्कार !

जळगाव तालुक्यातील समाधान पाटील (आव्हाणे) ,अनिल सपकाळे, धरणगाव तालुक्यातील प्रताप निंबा पाटील (भोणे), सुदर्शन पाटील (रोटवद), पाचोरा तालुक्यातील प्रवीण पाटील (राजुरी),सम्राट शिंदे (वडगाव), चाळीसगाव तालुक्यातील चंद्रकांत पाटील (शिरसगाव), ज्ञानेश्वर पाटील पिलखेडा), भडगाव तालुक्यातील संदीप सोनवणे (कनाशी), संजय महाजन (भोरटेक), आणि अमळनेर तालुक्यातील सौ. किरण पाटील (दहिवद), महेंद्र बोरसे (सारणी) तसेच पारोळा तालुक्यातील शेवगाव येथील भूमिपुत्र शेतकरी गट ,चाळीसगाव तालुक्यातील पिंपरी येथील साईकृपा शेतकरी गट आणि भडगाव तालुक्यातील येथील विठ्ठल रुक्मिणी शेतकरी गट या 3 शेतकरी गटांना व 16 शेतकऱ्यांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सहकार राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून प्रत्येकी 10 हजाराचा धनादेश देण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. उज्वलाताई पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषद सदस्या यमुना रोटे, जैन इरिगेशनचे के. बी. पाटील, केळी संशोधन केंद्राचे डॉ. एन. बी. शेख, तेलबिया संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुदाम पाटील, कृषि केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक डॉ. हेमंत बाहेती उपस्थित होते.

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी बाजारपेठांचा विचार करुन शेतीचे नियोजन करावे. कृषि विभागाने जिल्हास्तरा बरोबरच यापुढे तालुका तसेच गाव पातळीपर्यंत कृषि मेळाव्यांचे आयोजन केल्यास खऱ्या अर्थाने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी उपयोगी योजनांचा लाभ पोहचविणे शक्य होईल.

आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या मनोगतात शेतीला व्यावसाईक स्वरूप प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी यापुढे शेतीला आधुनिकतेची जोड देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शेतीसोबतच कुक्कुटपालन, मत्सशेती, दुग्ध व्यवसाय अशा जोड धंद्याची कास धरावी. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी शेतकरी मेळाव्याचा उद्देश सविस्तरपणे विषद करून सामुहिक शेती आणि गट शेतीचे महत्व उपस्थितांना सांगितले.

कार्यक्रमात डॉ. बाहेती, डॉ. के. बी. पाटील, डॉ. एन. बी. शेख यांची समयोचित भाषणे झालीत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले. शेवटी डॉ. बाहेती यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सत्कारार्थींचे शेतकऱ्यांचे कुटूंबिय व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content