आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जळगाव प्रतिनिधी । शिरसोलीकडून जळगाव तोलकाट्याकडे जाणाऱ्या आयशरने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार  झाला. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजता अंजिठा चौकात घडली. पोलिसांनी आयशर ताब्यात घेतले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की,  शिवलाल छगन वाणी (रा़ प्रजापतनगर) हे कुटूंबासह वास्तव्यास होते़ त्यांचे फर्निचरचे दुकान होते. या व्यवसायतून ते घराचा उदरनिर्वाह करायचे. काही कामानिमित्त ते शुक्रवारी औरंगाबाद रस्त्याकडे दुचाकीने (एमएच १९ डीएम ८९४९) गेले होते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घराकडे येत असताना शिरसोलीकडून जळगाव तोलकाट्याकडे जाणाऱ्या आयशर (क्र. एमएच १९ झेड ५३०६) या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून जागीच मृत्यू झाला़ अपघात झाल्याचे कळताच जवळच असलेले पोलीस कर्मचारी मुद्दसर काझी, आसीम तडवी, दीपक शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेवून वाणी यांना जिल्हा रूग्णालयात हलविले़ मात्र, तपासणीअंती त्यांना मृत घोषित करण्यात आले़ पोलिसांनी आयशर ताब्यात घेतले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content