जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव खरेदीअंतर्गत डाळवर्गीय शेतीउत्पादनासाठी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद असून हरबऱ्यासाठी ६हजार ८०८ तर तूर उत्पादनासाठी ३४० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, तर १४६२ शेतकऱ्यांचा हरबरा खरेदी करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा विपणन प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात हमीभाव खरेदीअंतर्गत तूर आणि हरबरा उत्पादनासाठी शासनस्तरावरून ऑनलाईन नोंदणी डिसेंबर अखेरीस सुरु करण्यात आली होती. यात हरबरा उत्पादनासाठी ५ हजार २३० रुपये तर तुरीसाठी ६ हजार ३०० रुपये हमीभाव आहे. त्यानुसार हरबरा उत्पादनासाठी ६ हजार ८०८ तर तुरीसाठी ३४० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. या नोंदणीनुसार आतापर्यत १ हजार ४६२ शेतकऱ्यांचा २३ हजार १४५ क्विंटल हरबरा तर २३ शेतकऱ्यांकडील ९९.५० क्विंटल तूर हमीभाव योजनेद्वारे शासनस्तरावरून खरेदी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा विपणन अधिकारी गजानन मगरे यांनी दिली.
यंदा हंगामाच्या सुरवातीचे आणि नंतरचे चित्र हे वेगळेच राहिलेले आहे. सोयाबीन असो की कापूस आणि आता तूर सुरवातीला कमी दर आणि अवघ्या महिन्यात चित्र बदलण्यास सुरवात. आतापर्यंत जे सोयाबीन आणि कापसाच्या बाबतीत घडले तेच आता तुरीबाबत होताना दिसत आहे. यंदा उत्पादन घटूनही सुरवातीला तुरीला 5 हजार 800 पर्यंतचा दर होता. दीड महिन्यातच तुरीच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे. यावर्षीदेखील नाफेडच्या माध्यमातून हमीभाव केंद्र सुरु करण्यात आली आहेत. या खरेदी केंद्रावर तुरीला 6 हजार 300 चा दर ठरवून देण्यात आला आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कल कमी असला तरी केंद्राची स्थापना होताच बाजारपेठेतले दरही वाढले आहेत.
हमीभाव खरेदीअंतर्गत शेतकऱ्यांचा प्रतिसाद
3 years ago
No Comments