केंद्र सरकारची आज आंदोलक शेतकर्‍यांसोबत चर्चा

नवी दिल्ली – शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मागणीचा आग्रह धरणार्‍या शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी आज, बुधवारी केंद्रीय मंत्रिगटाची सातव्यांदा बैठक होणार आहे. या बैठकीत कृषी कायद्यांविषयी काय तोडगा निघतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांना सरकारशी बोलणी करण्यासाठी विज्ञान भवनात आज दुपारी दोन वाजता चर्चा होणार आहे. दरम्यान, कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांनी ४० शेतकरी संघटनांच्या प्रमुखांना पत्र लिहून ३० डिसेंबरच्या बैठकीसाठी बोलावले आहे. या सर्व शेतकरी संघटना संयुक्त किसान मोर्चाच्या फलकाखाली सरकारशी चर्चा करीत आहेत. सरकारने कायदे मागे घेतले तर आम्ही लगेच दिल्लीच्या सर्व सीमा मोकळ्या करून देऊ, असे आश्‍वासन शेतकरी नेत्यांनी दिले आहे.

यामुळे आजच्या बैठकीतून तरी आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये काही तरी तोडगा निघेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे सुरू असलेल्या आंदोलनाला महिना उलटून गेला आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. आता केरळमधील अननस उत्पादक शेतकर्‍यांनी या आंदोलनकर्त्यांसाठी मोफत अननस पाठविले आहे.

Protected Content