जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट विम्याचा लाभ देण्यात यावा – आ. खडसे (व्हिडीओ)

eknath khadse

जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असून त्यांचा खरीप पिकासाठी पीकविमा काढण्यात आलेला आहे. त्यासाठी दोन हेक्टरची अट असून ज्यांची शेती त्यापेक्षा थोडी जास्त अशा शेतकऱ्यांना नियमामुळे पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. अशा सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी आ. एकनाथराव खडसे, खा. रक्षाताई खडसे व जिल्हा बँकेचे एम.डी. यांनी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे जनरल मॅनेजर सौम्या व चेअरमन यांच्याकडे केल्याची माहिती आज (दि.२०) आ. खडसे यांनी येथे ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना दिली.

 

ते यावेळी पुढे म्हणाले की, यावेळी ओरिएन्टल इन्शुरन्सच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मांडण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे. शेतकऱ्यांना यंदा एकही पीक नीट घेता आलेले नाही. त्यात घेतलेल्या कर्जाची वसुली व वीज बिल तसेच पुढल्यावर्षी पुन्हा हंगामात पेरणीचा खर्च या सगळ्या बाबी विचारात घेतल्या तर त्यांना देण्यात आलेली हेक्टरी आठ हजार रुपये ही रक्कम तोकडी आहे. त्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये भरपाई मिळावी, अशी आमची मागणी आहे. अनेक शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यात तांत्रिक अडचणी आहेत. त्याही दूर करण्यात याव्या आणि सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी.

त्यातच राज्यात सरकार नसल्याने प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही, त्यामुळे कुणाचे का असेना पण राज्यात लवकरात लवकर सरकार अस्तित्वात यावे. गेली दोन-तीन वर्षे कोरडा दुष्काळ आणि आता यंदाचा ओला दुष्काळ यामुळे शेतकरी मोडून पडलेला आहे, त्याला मदतीचा हात देण्याची अत्यंत गरज आहे. त्याला त्वरित मदत मिळायला हवी, असेही आ. खडसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

Protected Content