शेतात शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय, संपविली जीवनयात्रा


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जळोद गावात राहणाऱ्या एका शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी २३ जून रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलीप उत्तम ठाकरे वय ५४ रा. जळोद ता. अमळनेर असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील जळोद येथे दिलीप ठाकरे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. सोमवारी २३ जून रोजी ते सकाळीच शेतात निघुन गेले. त्यानंतर घरी परतले नाही. त्यांनी तुळशीराम पाटील यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार नातेवाईकांना सकाळी साडेनऊ वाजता समजला. त्यांनी तातडीने शेतात धाव घेवून खासगी वाहनातून तातडीने अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.