Home क्राईम अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची धडक कारवाई ; ३ ब्रास गौण खनिजासह...

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची धडक कारवाई ; ३ ब्रास गौण खनिजासह डंपर जप्त

0
3

वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात मोठी धडक कारवाई करत सुमारे ३ ब्रास अवैध गौण खनिज (मुरूम) वाहतूक करणारा डंपर जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभागाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

महसूल विभागाला तळवेल परिसरात अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे महसूल पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून MH.19.CX.6711 क्रमांकाचा डंपर अडविला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे ३ ब्रास गौण खनिज (मुरूम) अवैधरित्या वाहून नेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात चालक सतीश गोपाल कोळी (रा. वझरखेडा) याच्याकडून डंपर ताब्यात घेण्यात आला असून, वाहनाचा मालक अनिकेत इंगळे (रा. वझरखेडा) असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. संबंधितांकडे गौण खनिज वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व वैध कागदपत्रे उपलब्ध नसल्याने वाहन जप्त करण्यात आले असून, महाराष्ट्र महसूल नियमांनुसार पुढील दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई भुसावळ तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव मंडळ अधिकारी रजनी तायडे, पोलीस उपनिरीक्षक जैन तसेच महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी मनोज म्हस्के, सुधाकर शिंदे, यासीन पिंजारी आणि प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडली. महसूल व पोलीस विभागाच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्यात आली. महसूल प्रशासनाने स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही सातत्याने आणि अधिक तीव्रतेने कारवाई करण्यात येणार असून अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येतील.


Protected Content

Play sound