भीषण अपघात: दोन ट्रकची समोरासमोर धडक, चालकाचा जागीच मृत्यू !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरा नजीक राष्ट्रीय महामार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ आज एक भीषण अपघात घडला. दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या भीषण अपघातात एका ट्रक चालकाचा केबिनमध्ये दबला जाऊन जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसऱ्या ट्रक चालकालाही दुखापत झाली असून, त्याच्या एका डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.

ओडिशा पासिंगचा ट्रक (क्रमांक ओडी 15 सी.2963) व राजस्थान पासिंगचा ट्रक (क्रमांक आर.जी.14 जेटी 0421) यांच्यात यांचा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की, दोन्ही ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलिसांच्या माध्यमातून तातडीने सुरू करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांची मदत, पोलिसांचा पंचनामा सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताचा पंचनामा सुरू केला असून पुढील कार्यवाही करत आहेत. मृत पावलेला ट्रक चालक केबिनमध्ये पूर्णपणे अडकला होता. स्थानिक नागरिकांनी दोरीच्या साहाय्याने केबिन ओढून चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.