जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आव्हाणे शिवारातील शेतात रोटोव्हेटर करत असलेल्या ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातात शेतात काम करणाऱ्या शेतमजूरी जखमी झाला होता. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळू दयाराम देवरे वय ३२ रा. आव्हाणे ता. जळगाव असे मयताचे नाव आहे.
तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, भडगाव तालुक्यातील रहिवासी बाळू देवरे हे कामानिमित्ताने त्यांचे सासर असलेल्या जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावात राहत होते. पत्नी एक मुलगा असा त्यांचा परिवार असून गावातील शेतकरी विजय शामराव पाटील यांच्या शेतात ते कामाला होते. याच शेतात बाळू देवरे यांचे सासरे गौतम साबळे हे सुध्दा मजुरीने काम करतात. २५ मे २०२२ रोजी सकाळी विजय पाटील यांच्या शेतात ट्रॅक्टरव्दारे रोटोव्हेटरचे काम सुरु होते. बाळू देवरे हे या रोटोव्हेटरवर देखरेखीचे काम करत होते. यादरम्यान ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटले, भरधाव ट्रॅक्टरने बाळू देवरे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात बाळू देवरे यांचा पाय कापला गेला होता त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतांना, ४ जून रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बाळू देवरे यांचा मृत्यू झाला. मयत बाळू देवरे यांच्या पश्चात पत्नी मनीषा व चेतन वय ९ वर्ष असा परिवार आहे.
या अपघातास कारणीभूत ट्रॅक्टरवरील चालक आधार बाबुलाल लोंढवे ता. अमळनेर याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड करीत आहेत.