फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ३५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा मार्ग मोकळा झाला असून, बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी या विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे आणि आमदार नंदू भाऊ महाजन यांच्या सहकार्याने, यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा जावळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना फैजपूरच्या नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांच्या पाठपुराव्याची साथ मिळाली आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला आता नवी गती मिळणार असून, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, उद्याने, मनोरंजन आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागणार आहेत.
फैजपूर शहरातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, खराब रस्त्यांचा प्रश्न सोडविणे, पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करणे, सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य देणे आणि आधुनिक नागरी सुविधांची निर्मिती करणे, या उद्देशाने विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांमुळे शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण, काँक्रिटीकरण, डांबरीकरण तसेच गटार बांधकामासाठी २ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. नगरोत्थान योजनेंतर्गत भुसावळ रस्त्याच्या डांबरीकरण व काँक्रिटीकरणासाठी ३ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. याशिवाय फैजपूर गावांतर्गत रस्ते मजबुतीकरण व खडीकरणासाठी स्वतंत्रपणे १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत सार्वजनिक शौचालये व मुतारी बांधकामासाठी १ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी हे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेंतर्गत विविध भागांतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी १ कोटी ९५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शिक्षण आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात येणार आहेत. म्युनिसिपल हायस्कूलच्या सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी १ कोटी रुपये, तर शहरात नमो उद्यान विकसित करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळण्याबरोबरच शहरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी सुंदर उद्यान उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
शहरातील नागरिकांना अभ्यासासाठी स्वतंत्र जागा आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी सभागृह उपलब्ध व्हावे, यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत अभ्यासिका व सामाजिक सभागृहाच्या बांधकामासाठी १ कोटी २८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय नगरपालिकेच्या जागेवर आधुनिक रिक्रिएशन सेंटर उभारण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सुविधांमुळे तरुणांसह विविध वयोगटांतील नागरिकांना उपयुक्त जागा उपलब्ध होणार आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठीही विशेष लक्ष देण्यात आले आहे. पाइपलाइन, बोअरवेल, फिल्टर टाकी दुरुस्ती तसेच लोखंडी चेंबर प्लेट बसविण्याच्या कामांसाठी १ कोटी १३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. शहरातील पाणीपुरवठा अधिक सुरळीत आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत.
या संपूर्ण विकास आराखड्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या कामांमध्ये घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ३ कोटी ८४ लाख रुपये, तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी तब्बल १४ कोटी ४७ लाख ७६ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे शहरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि पर्यावरण संरक्षणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय फैजपूर शहर सुशोभीकरण आणि घाडी नदी पुलाच्या सुशोभीकरणासाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहराच्या विकासासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून विकासकामे सुरू करणे आवश्यक असते. याच भूमिकेतून मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे मार्गदर्शन आणि आमदार अमोलदादा जावळे यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले आहेत. नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांनीही विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. या प्रक्रियेत सर्व नगरसेवक, आजी-माजी नगराध्यक्ष आणि विविध पदाधिकाऱ्यांचे सहकार्य व योगदानही महत्त्वाचे ठरले आहे. या विकासकामांमुळे फैजपूर शहरातील विविध प्रभागांमधील नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळणार असून, शहराच्या नागरी विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण, सामाजिक सुविधा, उद्याने आणि आधुनिक सांडपाणी व्यवस्थापन अशा सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणारा हा विकास आराखडा शहराच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.



