तलवारीच्या धाकावर दहशत : तरूणाला अटक

फैजपूर, ता. यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील न्हावी येथे तलवारीच्या धाकावर दहशत पसरवणार्‍या तरूणाला पोलिसांनी गजाआड केले आहे.

एलसीबीच्या पथकाने केतन मधुकर पाटील (वय २७) यास तलवारींसह न्हावी येथून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त माहिती मिळाली की, न्हावी गावातील वाणी वाडा भागात राहणार्‍या केतन पाटील याच्याकडे तलवार असून तो त्याद्वारे धाक दाखवून दहशत माजवत असतो.

त्यावरून एलसीबीच्या पथकाने न्हावी येथे जाऊन केतन पाटील यास ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने त्याच्या राहत्या घरातून ३ तलवारी काढून दिल्या. त्याच्या विरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. राजेश बर्‍हाटे, देविदास सरदार, महेंद्र महाजन, श्रीकांत इंगळे करत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बकाले यांच्या पथकातील पो.हे.कॉ. महेश आत्माराम महाजन, अक्रम शेख, याकूब शेख, चालक विजय गिरधर चौधरी यांनी केली.

Protected Content