Home धर्म-समाज यावलमध्ये बाल संस्कार विद्यालयाच्या २६ व्या शारदोत्सवाला उत्साहात प्रारंभ 

यावलमध्ये बाल संस्कार विद्यालयाच्या २६ व्या शारदोत्सवाला उत्साहात प्रारंभ 

0
6

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी, यावल संचलित बाल संस्कार बालवाडी, बाल संस्कार विद्या मंदिर आणि बाल संस्कार माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६ व्या शारदोत्सवाला रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. श्री शारदा मातेच्या भव्य मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, झांज, लेझीम, कळशी आणि दांडिया पथकांच्या सहभागामुळे यावल शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

सकाळी ८ वाजता श्रीहरी मोरेश्वर कवडीवाले यांच्या निवासस्थानापासून श्री शारदा मातेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. विविध पथकांच्या तालबद्ध सादरीकरणामुळे मिरवणुकीत उत्साहाची भर पडली. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करणारी ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कला आणि पथकांच्या आकर्षक सादरीकरणाचे नागरिकांनी कौतुक केले. शारदोत्सवाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी आणि ज्योती वाणी यांच्या हस्ते सपत्नीक श्री शारदा मातेची विधिवत स्थापना करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यामुळे उत्सवाला भक्तिमय प्रारंभ झाला. मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी यावल पोलीस दलाचे मोलाचे सहकार्य लाभले. या मिरवणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी किंजल दीपक बडगुजर आणि गिरीश सुधाकर सोनार (बालवाडी), तसेच प्रतीक किशोर पाटील आणि चंचल राजेश भोईटे (इयत्ता चौथी) यांच्यासह विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले.

शारदोत्सवाच्या यशस्वितेसाठी बालवाडीच्या मुख्याध्यापिका अंजली कवडीवाले, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील माळी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अतुल गर्गे, तसेच उत्सवप्रमुख सविता कमलाकर बारी आणि राजेंद्र गोपाळ फालक यांनी नियोजन केले. संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उत्सवाचा प्रारंभ उत्साहात झाला. या २६ व्या शारदोत्सवानिमित्त पुढील तीन दिवस विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन देणे आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना करणे, या दृष्टीने या उत्सवाला महत्त्व प्राप्त झाले आहे.


Protected Content

Play sound