Home Cities जळगाव शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जळगावची बाजारपेठ गजबजली 

शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी जळगावची बाजारपेठ गजबजली 

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाल्याने जळगाव शहरातील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नवरात्रोत्सवासाठी आवश्यक पूजेचे साहित्य, घटस्थापनेचे साहित्य, उपवासाचे पदार्थ आणि घरगुती उपयोगाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली. शहरात पारंपरिक पद्धतीने नऊ दिवस भरणारा नवरात्रोत्सवाचा विशेष बाजार सजल्याने परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले.

जळगाव शहरातील या पारंपरिक बाजाराची महिला वर्गाकडून दरवर्षी आतुरतेने प्रतीक्षा केली जाते. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील विविध दुकाने आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली आहेत. देवीच्या पूजेसाठी लागणारे घट, पूजेचे साहित्य, अगरबत्ती तसेच घटस्थापनेसाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय संसारोपयोगी साहित्य आणि उपवासासाठी लागणारे विविध पदार्थ खरेदी करण्यासाठीही नागरिकांनी दुकानांकडे गर्दी केली.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बाजारात खरेदीसाठी मोठी वर्दळ दिसून आली. सकाळपासूनच महिला आणि कुटुंबीय पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारात दाखल झाले होते. नवरात्रोत्सवात देवीची आराधना, घटस्थापना आणि उपवासाला विशेष महत्त्व असल्याने या काळात पूजेचे साहित्य आणि उपवासाच्या पदार्थांना मागणी असते. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान, बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढल्याने सुभाष चौक परिसरातील काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची वर्दळ आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. नवरात्रोत्सवाचे पुढील नऊ दिवस बाजारपेठेत गर्दी कायम राहण्याची शक्यता असल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound