Home Cities रावेर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे – डॉ. गुलाबराव पाटील

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे – डॉ. गुलाबराव पाटील

0
7

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासोबतच त्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक उपकरणे, नावीन्यपूर्ण प्रकल्प आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून भविष्यातील तंत्रज्ञानाची झलक दाखविली असून, त्यांची कल्पकता आणि प्रयोगशीलता कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पोदार स्कूल, रावेरचे अध्यक्ष डॉ. गुलाबराव पाटील यांनी केले.

रावेर शहरातील पोदार लर्न स्कूल येथे आयोजित ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनात रावेर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध क्षेत्रांतील नावीन्यपूर्ण प्रकल्प आणि प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, संशोधनवृत्तीला आणि वैज्ञानिक विचारांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित उपकरणे आणि प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानातील संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणक्षमता, तर्कशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि संशोधनाची आवड विकसित होण्यास मदत होते. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भविष्यातील संधींची ओळख होण्यासही हातभार लागतो.

या विज्ञान प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रात्यक्षिकांची पुढील स्तरावरील प्रदर्शनांसाठी निवड करण्यात आली. मुख्यमंत्रीस्तरीय विज्ञान परिषदेसाठी तीन प्रात्यक्षिकांची निवड झाली, तर सहा प्रात्यक्षिके सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. याशिवाय शिक्षकांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांमधून तीन शिक्षकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला पोदार लर्न स्कूल, रावेरचे अध्यक्ष डॉ. गुलाबराव पाटील, सचिव सौ. सुचिता पाटील, गट विकास अधिकारी विनोद मेढे, पोषण आहार अधिक्षक रविंद्र बखाल, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी साहेबराव शिंदे, केंद्रप्रमुख भूषण चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक उपक्रमांचे कौतुक करून विज्ञान शिक्षण आणि प्रयोगशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पोदार लर्न स्कूल, रावेरचे मुख्याध्यापक डॉ. जतीन हिंदुजा यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी संदीप पाटील सर तसेच सर्व पर्यवेक्षकांनीही प्रदर्शनाच्या आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले.


Protected Content

Play sound