तत्कालीन सत्ताधार्‍यांमुळे फैजपूर पालिकेला १ कोटी ३१ लाखाचा भुर्दंड

faizpur palika meeting

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । फैजपूर पालिकेच्या तत्कालीन सत्ताधार्‍यांमुळे मक्तेदाराचे सेटलमेंट करण्यासाठी १ कोटी ३१ लाख रूपयांचा भुर्दंड बसला असून विशेष सभेत याला मंजुरी देण्यात आली.

फैजपूर पालिकेची विशेष सभा शनिवारी पालिका सभागृहात नगराध्यक्षा सौ महानंदा होले यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती. यावेळी विषय पत्रिकेवर सहा विषय चर्चेसाठी होते. यावेळी महत्वपूर्ण विषय म्हणजे सन १९९६ मध्ये पालिकेच्या आरक्षण क्रमांक ४५ सि स नं ३८०७ व्यापारी संकुलाचा उपस्थित करण्यात आला होता. संबंधीत दुकान बांधकाम करण्याचा मक्ता मक्तेदार एम. बी. अंगडी यांनी घेतला होता त्यांना माक्त्याची संपूर्ण रक्कम पालिकेने अदा केली. मात्र मक्तेदाराने त्यांच्याकडील मशनिरी व मजुरांबाबत पालिकेविरुध्द नुकसान भरपाईचा मागणी दावा न्यायालयात दाखल केला असून हा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यावेळच्या संबंधित पदाधिकारी व तत्कालीन अधिकारी यांच्याकडून या विषयी गंभीर पणे विचार केला गेला नाही. दरम्यान सदर मक्तेदाराने उच्च न्यायालयात भरपाईचा दावा दाखल करून साडेतीन कोटीची मागणी न्यायालयासमोर केलेली आहे. या दाव्या विषयी पालिकेने अपील दाखल केल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने उच्च न्यायालय येथे १३नोव्हेंबर २०१८ अखेर तीन टप्प्यात एक कोटी रुपये जमा केले मक्तेदार याने न्यायालयासमोर मागणी केलेली रक्कम १८ टक्के व्याजासह ४ कोटीच्या जवळपास असल्याने मक्तेदार याने नुकसानभरपाई विषयी तडजोड करण्यासाठी सकारात्मक तयारी दाखविल्याने भविष्यात ही रक्कम मोठया प्रमाणात होऊन विकासकाच्या घश्यात जाऊ नये हा कटू प्रसंग
टाळण्यासाठी पालिका प्रशासन व विद्यमान पदाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित केले.

पालिकेच्या विशेष सभेत मक्तेदार एम बी अंगडी यांनी न्यायालयासमोर केलेल्या नुकसानभरपाई दाव्या विषयी उच्च न्यायालयात मध्यस्थी न्यायालयातील झालेल्या तडजोडिस मान्यता देण्यासाठीच्या विषयाला याप्रसंगी मंजुरी देण्यात आली. यात तडजोडी अंती १ कोटी ३१ लाख या रकमेवर मक्तेदार व पालिका दोन्ही पक्षाकडून दाव्याची रक्कम निश्‍चित करण्यात आली आहे. या तडजोडीनंतर पालिकेच्या मालमत्ता ह्या सुरक्षित राहणार आहे. गेल्या २३ वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेल्या या विषयाला मक्तेदार व पालिकेच्या तडजोडीनंतर पूर्णविराम मिळणार आहे. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष रशीद तडवी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, तर सभेला भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे, काँग्रेस गटनेता कलीम खा मण्यार ,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता शेख कुर्बान, माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक हेमराज चौधरी यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. विषय पत्रिकेचे वाचन पालिका बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक दिलीप वाघमारे, यांनी केले तर सभेचे कामकाज सहाय्यक कार्यालय निरीक्षक संतोष वाणी यांनी पाहिले.

Protected Content