महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांची बुंदी तुला

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील सतपंथ मंदिर देवस्थानाचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अवतरण दिनाचे औचित्य साधून आज भक्त मंडळीतर्फे सकाळी बुंदी तुला करण्यात आली.

येथील सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती आचार्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या ४४ व्या अवतरण दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने बुंदीतुलासह दर्शन, पूजन आदी विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.

या अनुषंगाने आज पहाटे ब्रह्मलीन गुरू जगन्नाथ महाराज यांच्या शेतातील समाधी स्थळी दर्शनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मोठा मारूती मंदिरात विधीवत पूजन, आरती झाली.

यानंतर सतपंथ देवस्थानाच्या मंदिरात महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या पादुकांचे खास तामिळनाडूतून आलेले शिष्य हरीलाल पटेल यांनी सपत्नीक पूजन केले. याप्रसंगी भक्त मंडळीने बुंदी तुला केली.ही बुंदी भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे. भाविकांसाठी दिवसभर मंदिरात दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन देवस्थानातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content