जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘स्तनपान जागृती सप्ताहा’च्या अनुषंगानं वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ‘प्रत्येक मातेने बाळाच्या पहिल्या सहा महिन्यांपर्यंत त्याला दूध पाजलेच पाहिजे..’ यासह इतर महत्वपूर्ण संदेश बाळंतीण माता व त्यांच्या नातेवाईकांना ‘मी आई’ या लघुनाट्यातून दिले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्या वतीने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव‘ अभियानांतर्गत ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ निमित्ताने ‘मी आई‘ या लघुनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘प्रत्येक मातेने बाळाच्या पहिल्या सहा महिन्यांपर्यंत त्याला दूध पाजलेच पाहिजे. बाटलीने कधीच दूध पाजू नका. प्रत्येक बाळंतीण मातेची काळजी घेण्याचे काम घरातील जेष्ठ स्त्रीचे आहे. बाळंतिणीच्या आहाराकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका..’ असे महत्वपूर्ण संदेश देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. योगिता बावस्कर हे मंचावर उपस्थित होते.
प्रस्तावनेतून डॉ. योगिता बावसकर यांनी, कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट करीत स्तनपान करणे हा प्रत्येक आईचा व बाळाचा अधिकार आहे, अशी माहिती दिली. यावेळी विद्यार्थी, डॉक्टर्स, कर्मचारी यांना स्तनपान समर्थनाची शपथ देण्यात आली. प्रसंगी ‘मी आई‘ हे लघुनाट्य वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. सहा महिने अंगावरील दूध पाजल्यानंतर प्रत्येक मातेने डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला आहार सुरु करावा, असे सांगून मातेने बाळाला दूध पाजताना कसे धरले पाहिजे, दूध पाजण्याचा पद्धती, आई व नातेवाईकांना असणाऱ्या चुकीच्या समजुती याविषयी लघुनाट्यात विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.
लघुनाट्यात पवन बिष्णोई, वसुंधरा गीते, हर्षदा पाटील, अविरत पांडव, शिवराज मुसळे, सुमित दत्ता, हनीफा मोमीन, ऋत्विक जगताप, साक्षी गायकवाड, विशाल प्रजापती, अंजली शाहू यांनी सहभाग घेतला. डॉ. किशोर इंगोले यांनी, एचआयव्ही बाधित मातेच्या स्तनपानाविषयी माहिती दिली. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी म्हटले कि, “स्तनपान ही बाळासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. बाळाला वयाच्या सहा महिन्यांपर्यंत केवळ हाच आहार देण्यात येतो. पण बाळाला योग्य प्रकारे स्तनपान देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश लोखंडे यांनी तर आभार डॉ. डॅनियल साजी यांनी मानले. प्रसंगी डॉ. विलास मालकर, डॉ. इम्रान तेली, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. अनिल पाटील, डॉ. योगिता सुलक्षणे, डॉ. प्रदीप लोखंडे, डॉ. शिवहर जनकवाडे, डॉ. विनेश पावरा, डॉ. चंदन महाजन, डॉ. राजश्री येसगे, डॉ. शबनम बेग, डॉ. पूजा बजुडे, समाजसेवा अधीक्षक संदीप बागुल, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी, मनीषा डवरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी राकेश पिंपरकर, सुनील शिंदे, बापूसाहेब पाटील, विवेक वतपाल, प्रकाश पाटील, राकेश सोनार आदींनी परिश्रम घेतले.