साकरी येथे २९ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात


साकरी -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकरी येथील सन् १९५८ मध्ये स्थापन झालेल्या जनता हायस्कूलच्या १९९६ च्या बॅचमधील माजी विद्यार्थी तब्बल २९ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. आजच्या धावपळीच्या जीवनात बालपणीच्या मित्रमैत्रिणींना वेळ देणे अवघड असताना, या बॅचने आपले शालेय आयुष्य पुन्हा एकदा उजळवण्याचा सुंदर प्रयत्न केला. या स्नेहमेळाव्यात सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांशी अनुभव, भावना आणि आठवणींची देवाणघेवाण केली.

या अनोख्या भेटीत सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. बालपणीच्या शाळेच्या गप्पा, शिक्षकांच्या आठवणी, एकत्र खाल्लेला डबा, खेळांच्या गोष्टी अशा अनेक आठवणींनी वातावरण भारावून गेले. प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त करत शाळेच्या सुवर्णकाळाचा पुन्हा अनुभव घेतला.

या बॅचमधील अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. भूषण फेंगडे हे स्पर्धा परीक्षा पास करून सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. डॉ. दीपक भंगाळे हे एम.एस. पदवीधर असून दिल्लीतील वेदांता हॉस्पिटल येथे न्यूरॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. डॉ. निखिल राणे हे एम.डी. असून मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. सचिन नेहेते हे सध्या अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, तर पंकज बोरोले हे पुण्यात सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत. ऋषिकेश वाकडे हे आय.डी.बी.आय. बँक, पुणे येथे चीफ मॅनेजर पदावर कार्यरत आहेत.

या बॅचमधील काही मुली मुंबईतील नामांकित शाळांमध्ये शिक्षिका म्हणून काम करतात, तर काही विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय सांभाळत समाजात आपली ओळख निर्माण करत आहेत. या गटाचे वैशिष्ट्य म्हणजे, कोणत्याही सहाध्यायाला अडचण आल्यास सर्वजण तत्परतेने मदतीला धावून जातात. हा आपुलकीचा बंधच त्यांच्या मैत्रीला अधिक दृढ करतो.

या स्नेहमेळाव्याचे आयोजन अनिल धर्मकार, सुरेश सुरडकर, रवी पाटील, तुषार फेंगडे, विद्या पाटील, वर्षा नेमाडे, मनीषा पाटील, रुपाली राणे आणि विमल भटकर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक केले. त्यांच्या संयोजनामुळे हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.