
वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज काळ्याफिती लावून कामकाज केले व काल घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. १३ मे २०२६ रोजी वरणगाव हायवेवर अपघात झाला, ज्यात सतीश विश्वनाथ बाविस्कर (वय ५५) गंभीर जखमी झाले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वेळेत प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी जळगाव येथे रुग्णाला रेफर केले. मात्र, 108 रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने रुग्णाला 7:10 PM ला रुग्णवाहिका मिळाली, आणि जळगाव येथे उपचारादरम्यान रात्री 9:20 PM ला रुग्णाचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर वरणगावातील काही लोकप्रतिनिधी व नागरिकांनी रुग्णालयावर ठिय्या आंदोलन केले व डॉक्टरांवर आरोप केले. गुरुवारचा दिवस गर्भवती मातांसाठी तपासणीचा दिवस असल्याने रुग्ण व उपस्थित नागरिकांचे कामही प्रभावित झाले. शासकीय कर्मचाऱ्यांवर शिवीगाळ करण्यात आली आणि त्यांनी प्रदान केलेल्या सेवेला दुर्लक्ष केले.
त्यामुळे आज वरणगाव ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून कामकाज केले आणि या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त केला. संबंधित कर्मचाऱ्यांनी शासनाला निवेदनाद्वारे माहिती दिली आहे की, रुग्णांना वेळेत सेवा देऊन देखील काही लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांकडून कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.
या वेळी वैद्यकीय अधीक्षक सचिन अहिरे, परिचारिका संगीता ढाके, पल्लवी सुरवाडे, शितल बोदडे, मोहिनी सोनवणे, प्रवीण पाटील, महेंद्र सोळंके, मनोज तायडे, माधुरी चांडले, ज्योती गुरव, सुजाता कोल्हे, इरफान पठाण, आकाश मेढे, भारती निकम आणि प्रकाश पाचपांडे यांसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी शासनाला निवेदनाद्वारे सूचना दिल्या आहेत की, रुग्णांना वेळेत सेवा देत असूनही अशा प्रकारच्या आरोपांना सामोरे जावे लागणे ही चिंताजनक बाब आहे.



