
जळगाव : लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात जागतिक सोरायसीस दिनानिमित्त जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात त्वचा विकार तज्ज्ञ डॉ. पंकज तळेले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सोरायसीस या त्वचारोगाविषयी सविस्तर माहिती दिली.
२९ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जागतिक सोरायसीस दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या त्वचा विकार विभागातर्फे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पंकज तळेले उपस्थित होते, तर व्यासपीठावर डॉ. स्वप्नील पाटील उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात डॉ. तळेले म्हणाले की, “सोरायसीस हा त्वचेचा एक गंभीर पण संसर्गजन्य नसलेला विकार आहे. शरीराच्या कोणत्याही भागावर लालसर, जाड, खवलेयुक्त आणि वेदनादायक डाग निर्माण होतात. हा आजार चुकीच्या स्वच्छतेमुळे होत नाही. डोक्याचा टाळू, कोपर, गुडघे, हात, पाय आणि पाठीचा भाग हे विशेषतः जास्त प्रभावित होणारे भाग आहेत.”
त्यांनी पुढे सांगितले की, या आजारासोबत खाज, जळजळ, वेदना आणि नखांमध्ये बदल दिसून येतात. काही रुग्णांना सांध्यांमध्येही सूज आणि वेदना जाणवतात. त्यांनी स्पष्ट केले की, सोरायसीस फक्त बाह्य त्वचा विकार नाही, तर तो मानसिक आरोग्यावर आणि सामाजिक संबंधांवरही परिणाम करतो. आधुनिक औषधोपचार आणि योग्य सल्ल्याने हा आजार नियंत्रणात ठेवता येतो, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील तृतीय वर्षाचे सुमारे १५० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी त्वचा विकार विभागातील डॉ. अभिलाष मोवळे, डॉ. आर्या कुलकर्णी आणि डॉ. मुस्कान खेतान यांनी परिश्रम घेतले.



