सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियोजीत स्व. हरीभाऊ जावळे केळी महामंडळाची स्थापना ही हिंगोणा येथे करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकार्यांकडे केली ाहे.
या संदर्भातील वृत्त असे की, हिंगोणा, ता यावल येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत टिशू कल्चर प्रयोगशाळा प्रकल्प स्थापन करण्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांची ७० एकर उपजाऊ जमीन विद्यापीठास हस्तांतरीत केलेली आहे. मात्र विद्यापीठाने हा प्रकल्प रद्द केल्याने ही जमीन पडून आहे. यामुळेच येथे स्व. हरीभाऊ जावळे केळी विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी राजेश वानखेडे यांनी निवेदनात केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील जवळपास ७५% ३५,००० हेक्टर केळीचे क्षेत्र हे एकट्या रावेर-यावल तालुक्यात असल्याने याच तालुक्यांत केळीवर संशोधन व सुविधा प्रकल्प स्थापन झाल्यास त्याचा जास्तीत जास्त शेतकर्यांना फायदा होऊ शकतो. सद्यस्थितीत जळगाव येथे म.फुले कृषी विद्यापीठांतर्गत केळी संशोधन केंद्र कार्यरत असून त्याचा जास्त अंतरामुळे पाहिजे तसा फायदा रावेर-यावल तालुक्यातील शेतकर्यांना घेता येत नाही.
दरम्यान, प्रस्तावित ’’हरिभाऊ जावळे केळी महामंडळ’’ हिंगोणा, ता.यावल येथे स्थापन झाल्यास जिल्ह्यातील जास्तीत जास्त म्हणजे रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर या प्रमुख उत्पादक तालुक्यातील शेतकर्यांना येथील संशोधन व सुविधांचा लाभ होईल. तसेच येथील स्थानिक वातावरणात संशोधन झाल्यास त्याचा प्रत्यक्ष उपयोग शेतकर्यांना होईल.तरी सर्व बाबींचा व उपलब्ध जागेचा विचार करता नियोजित ’’ कै हरिभाऊ जावळे केळी महामंडळ’’ कृषिमित्र कै.हरिभाऊ जावळे यांच्याच कर्मभूमीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जागेत हिंगोणा, ता.यावल येथे करावी अशी मागणी राजेश वानखेडे यांनी केली आहे.