रावेर शहरात चोरट्यांचा हैदोस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर पोलिस स्टेशन हद्दीत मागील सात दिवसांत तीन घरफोड्या आणि दोन चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे यांनी दिली.

चोरीच्या घटनांचा तपशील:
1. दि. २ फेब्रुवारी: सुरेश गणवानी यांच्या घरात चोरी झाली. १३,२०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
2. दि. ३ फेब्रुवारी: भिका प्रजापती यांच्या दुचाकीच्या डिकीतून चोरट्यांनी तब्बल तीन लाख रुपये लंपास केले.
3. दि. ३ फेब्रुवारी: रविंद्र चव्हाण यांच्या दुकानात चोरी झाली. ८,५४० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला.
4. दि. ५ फेब्रुवारी: अजनाड येथील रामकृष्ण चौधरी यांच्या घरात घरफोडी झाली. १०,००० रुपये चोरीस गेले.
5. दि. ५ फेब्रुवारी: इलेक्ट्रिकल पाण्याची मोटर (किंमत ८,५०० रुपये) चोरीस गेली.

चोरीच्या घटनांनी पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची डोकेदुखी वाढली आहे. गुन्हे शोध पथकाने अधिक सक्रिय होऊन तपासाला गती देण्याची गरज आहे. नागरिकांमधून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे.