एरंडोल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भरधाव वेगाने धावणार्या कारने दुचाकीला उडविल्याने दोन युवक जागीच ठार झाले असून एक पादचारी जखमी झाला आहे.
मर्सडीज कार जळगाव कडून एरंडोलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. या गाडीने सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीस धडक दिल्याने त्यात नितिन जामसिंग पाटील वय-२१वर्षे व घनश्याम भानुदास बडगुजर वय-२०वर्षे हे दुचाकीवरील दोन्ही युवक जागीच गतप्राण झाले. याशिवाय याच अपघातामध्ये ज्ञानेश्वर गणसिंग पाटील वय २२वर्षे हा पादचारी युवक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले आहे. या अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. हा अपघात पिंपळकोठा गावाजवळ घडला.
अपघाताची माहिती मिळताच माजी जि.प.सदस्य नानाभाऊ पोपट महाजन, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, मनोज पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी मदतकार्य केले. ज्ञानेश्वर पाटील या युवकास पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातात मृत झालेल्या दोन्ही तरूणांच्या नातेवाईकांच्या आक्रोशाने परिसर भावविव्हळ झाल्याचे दिसून येते. यातील मयत ज्ञानेश्वर पाटील हा २१जानेवारीला विवाहाच्या बंधनात अडकणार होता. तथापि, त्याआधीच क्रूर काळाने त्याच्यावर झडप घातली.