पिंप्राळ्यात दोन गटात वाद; नगरसेवकावर जीवघेणा हल्ला

जळगाव प्रतिनिधी । सकाळी झालेल्या वादाची पोलिसात तक्रार दिल्याचा राग आल्याने नगरसेवकासह त्यांच्या कुटुंबावर लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री पिंप्राळा हुडकोत घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरात एक रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळुन आला. यामुळे या रुग्णाच्या घराबाहेर नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी संसर्ग पसरु नये म्हणून नगरसेविका हसीनाबी शेख यांचा मुलगा शफी यांने नागरीकांना उद्देशुन ‘गर्दी करु नका, घरी जा, डॉक्टरांना सहकार्य करा’ असे म्हटले. याचा राग आल्यामुळे कोरोना पॉझीटीव्ह असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने नगरसेविका हसीनाबी यांना मारहाण केली. शिवीगाळ केली. यानंतर हसीनाबी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात जाऊन संबधितांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. यानंतर परिसरात शांतता झाली होती. दरम्यान, हसीनाबी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती मिळाल्यानंतर रात्री १०.३० वाजता हसन शेख अफजल, कामरान शेख रऊफ अब्दुल, राजा शेख अलीम व अलीम शेख युनूस हे चौघे हसीनाबी यांच्या घराबाहेर येऊन शिवीगाळ करीत होते. यावेळी हसीनाबी यांची मुले शफी व जमील हे दोघे बाहेर आले. यावेळी चौघांनी लोखंडी रॉड, पट्टी, लाकडी दांड्याने दोघांना मारहाण केली. ‘इनको जिंदा मत छोडना, इनको मार डालो’ अशी धमकी दिली. परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर मारहाण करणारे चौघे पळुन गेले. या मारहाणीत शफी शेख हे बेशुद्ध झाले आहेत. दोन्ही भावंडांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमील शेख गुरुवारी शुध्दीवर आल्यानंतर याप्रकरणी जमील यांच्या फिर्यादीवरुन हसन शेख, कामरान शेख, राजा शेख व अलीम शेख या चौघांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल पाटील करीत आहे.

Protected Content