शिवाजी नगर हुडकोत जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी, ४ जण जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगर हुडको परिसरात जुन्या वादातून दोन गटात महिलांसह पुरूषांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी ६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.  या घटनेत दोन्ही गटातील चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार झाल्यानंतर दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात पुजा जयभगवान सोरट यांच्या घराशेजारी देविदास शिंपी हा तरुण राहत असून त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली होती. त्या गुन्ह्यात तो नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीचा राग आल्याने  रविवारी ६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता देविदास शिंपी हा पुजा सोरट यांच्या घराजवळ येवून त्याने शिवीगाळ केली. दरम्यान, पुजा सोरट या मामा रविंद्र वांजरेकर, कलाबाई उर्फ सुनंदा वानखेडे व संजू हे त्याला समजविण्यासाठी गेले असता, अनिता शिंपी, कल्पेश शिंपी, यश शिंपी यांनी त्यांना शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी आसारीने व दगडाने मारुन गंभीर जखमी केले. त्यावेळी पुजा यांनी आपला जीव वाचविण्यासाठी त्याठिकाणी पडलेला दगड अनिता शिंपी यांच्या डोक्यात मारला आणि त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेत पोलिसात तक्रार देण्यासाठी ते पोलीस ठाण्यात आल्या. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अनिता शिंपी, कल्पेश शिंपी, यश शिंपी सर्व रा. शिवाजी नगर हुडको यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गटातील अनिता शिंपी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचा मुलगा कल्पेश हा दुकानावरुन घरी येत असतांना त्यांच्या मुलाला बघून पुजा सोरट यांनी अश्लिल शिवीगाळ केली. याबाबत त्याच्या कुटुंबियांना सांगण्यासाठी ते कलाबाई वानखेडे यांच्या घरी गेले असता, पुजा सोरट, त्यांचा मामा व कलाबाई हे त्यांना शिवीगाळ करु लागले. शिवीगाळ कशाला करता याचा बोलल्याचा राग आल्याने पुजाच्या मामाने हातातील काठीने कल्पेश शिंपी याला मारहाण केली. तसेच पुजा सोरट यांनी त्याठिकाणी पडलेला दगड अनिता शिंपी यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी पुजा सोरट, कलाबाई वानखेडे याच्यासह आणखी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content