वर्षा भोळे यांचा अभिनव हळदी कुंकू कार्यक्रम : विजय लुल्हे यांनी केला सत्कार

 

जळगाव, प्रतिनिधी । स्रीसुलभ लज्जा व पिढीजात भय हेच स्रियांच्या अनारोग्याचे मुळ आहे. वर्षा भोळे यांच्याप्रमाणे परंपरेचे जोखड झुगारून माता भगिनींनी क्रांतीज्योती सावित्री माते प्रमाणे समाजपरिवर्तन करणे डिजिटल काळात नितांत गरजेचे आहे असे प्रतिपादन विजय लुल्हे यांनी केले.  ते  असोदा येथील वर्षा भोळे यांचा अभिनव हळदी कुंकू कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल त्यांच्या निवासस्थानीआयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते.

संक्रांतीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात सॅनिटरी नॅपकिन देणे या क्रांतदर्शी उपक्रमाच्या राज्य प्रवर्तक वैशाली विसपुते यांची गौरव गाथा लुल्हे यांनी सांगितली. जि.प.केंद्र शाळा असोदा येथील मुख्याध्यापिका  सुनिता कोळी यांनी वर्षा भोळे यांचा शाल व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक देऊन सत्कार केला. विजय लुल्हे यांनी वर्षा भोळे यांचा सपती गिरीष भोळे यांचा  हृद्य सत्कार केला. सत्कारार्थी  वर्षा भोळे म्हणाल्या की ,” शुद्ध पाणी पुरवठा, महिला बालकांसाठी आरोग्य सुविधा, सार्वजनिक स्वच्छता, अन्याय अत्याचार विरुद्ध निर्भय लढा ही माझ्या ग्रामसेवेची अखंड चतुःसूत्री राहील. असोद्याच्या सासवा, नणंदा व भगिनींनी मला विश्वासपूर्वक बहुमताने निवडून सेवेची संधी दिली हे कृतज्ञता पूर्वक सांगतांना त्यांना आनंदाश्रू अनावर झाले.  गिरीष भोळे म्हणाले,” स्त्रियांना समाजसेवेत स्वातंत्र्य देणे यात स्त्रियांपेक्षा पुरुषांचाच सर्वार्थाने उद्धार आहे. पुरुष विद्वान होऊन अतर्क्य संशोधन करतात परंतू स्रियांप्रती संवेदनशून्य अन् विकृत होताहेत हे सोदाहरण सांगून त्यांनी अशा प्रवृत्तीचा तीव्र निषेध केला. मुख्याध्यापिका सुनिता कोळी, रेखा डाळवाले, योगिनी सोनवणे यांसह शिक्षिकांना वर्षा भोळे यांनी हळदी कुंकू करून सॅनेटरी नॅपकीनचे वाण देऊन त्यांच्यासाठी अखंड सौभाग्याची प्रार्थना केली. निरोगी व निरामय आयुष्यासाठी शुभेच्छा देत शुभाशिर्वाद घेतले. सूत्रसंचालन अर्चना गरुड सुर्वे यांनी व आभार सोनल महाजन यांनी मानले. 

 

Protected Content