मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील संवेदना फाऊंडेशनतर्फे राष्ट्रवादीच्या रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी तीन दिवसीय नवरात्री दांडिया गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी जळगाव जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे यांच्या हस्ते दुर्गा मातेची आरती करून दांडिया महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.
मुक्ताईनगर परिसरात पहिल्यांदाच अशा प्रकारे फक्त महिलांसाठी लाईव्ह ऑर्केस्ट्रासह नवरात्री दांडिया गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत पारंपरिक गुजराथी, राजस्थानी वेषभूषा करून दांडिया खेळण्यास आल्या होत्या
संवेदना फाऊंडेशनतर्फे दि ३० सप्टेंबर व १ आणि २ ऑक्टोंबर असे तीन दिवस या दांडिया गरबा महोत्सवाचे खास महिलांसाठी आयोजन केले आहे. यात ८ वर्षे ते १८ वर्ष यांचा एंजेल ग्रुप, वय १९ ते ४० वर्ष प्रिंसेस ग्रुप, आणि ४१ वर्षापासून पुढे क्विन ग्रुप आणि आई मुलगी अशा पाच ग्रुपमध्ये स्पर्धकांची विभागणी केली असून या ग्रुपमध्ये सर्वोत्तम वेशभूषा, सर्वोत्तम सादरीकरण, मुलगी आई सर्वोत्तम वेशभुषा आणि सादरीकरण याकरिता दररोज पंधरा पारितोषिके देण्यात येणार आहेत.
मुक्ताईनगरसारख्या निमशहरी भागात फक्त महिलांसाठी असेल असे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत नाही ही बाब लक्षात घेऊन रोहिणी खडसे यांनी त्यांच्या संवेदना फाऊंडेशनतर्फे फक्त महिलांसाठी या कार्यक्रमाचे पहिल्यांदा आयोजन असले तरी त्याला महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. महिलांचा वाढता प्रतिसाद बघता महिलांसाठी दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे रोहिणी खडसे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
कार्यक्रमस्थळी रोहिणी खडसे यांनी सुरू केलेल्या राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेतील त्यांना लाभलेल्या महिलांच्या प्रतिसादाची छायाचित्र असलेले बॅनर चौफेर लावण्यात आले आहेत तसेच क्रेनच्या साहाय्याने मैदानाच्या मध्यभागी केलेली शार्फी लाईटांची रोषणाई महिलांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.