जळगाव शहरात तीन दिवसीय संविधान महोत्सवाचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी | संविधान दिनानिमित्त जळगाव शहरात तीन दिवसीय संविधान महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात विविध पुरोगामी विचारांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

 

संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध पुरोगामी विचारांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक अजिंठा शासकीय विश्रामगृहात आज रविवार दिनांक ३१ ऑक्टोबर आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत २६ नोव्हेंबर संविधान दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत संविधान रॅली, २७ नोव्हेंबर रोजी संविधानाचे अभ्यासक डॉ.सुरेश माने, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ.विश्वंभर चौधरी, अॅड. असीम सरोदे आदी विचारवंतांच्या उपस्थितीत परिसंवाद,२८ नोव्हेंबर रोजी संविधान जागर असे कार्यक्रम घेवून सलग तीन दिवस संविधान महोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले. मुकुंद सपकाळे यांनी अध्यक्षीय भाषणात प्रस्थापित व्यवस्था संविधान संपवायचा प्रयत्न करत असल्याने जनतेला संविधानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभे रहावे लागेल असे सांगितले. प्रास्ताविक करताना भारत ससाणे यांनी संविधान दिनाचे महत्व विषद केले. बैठकीला लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, संविधान जागर समितीचे बाबुराव वाघ, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे रमेश सोनवणे, चंदन बिऱ्हाडे, दिलीप सपकाळे, प्रहार जनशक्तीचे युवक अध्यक्ष निलेश बोरा, हरीश कुमावत, विजय कुमार मौर्य, उदय सपकाळे, मिलिंद तायडे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे,जयपाल धुरंधर, संदीप शिरसाठ राधे, गौतम सोनवणे,नाना मगरे, सचिन श्रावणे, संदीप सपकाळे, दिलीप अहिरे, आकाश सपकाळे, महेंद्र केदार यांच्यासह शहरातील पुरोगामी विचारांच्या संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content