Home Cities जळगाव अतिक्रमण विभागाची धडक कारवाई : कापड विक्रेत्यांची दुकाने जमीनदोस्त !

अतिक्रमण विभागाची धडक कारवाई : कापड विक्रेत्यांची दुकाने जमीनदोस्त !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने आज शहराच्या मुख्य भागांत धडक कारवाई करत रस्ते मोकळे केले आहेत. बुधवारी २९ एप्रिल सकाळी ९ वाजता अजिंठा रोडवरील काशिनाथ लॉज ते रेमंड चौफुली दरम्यान असलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि कापड विक्रेत्यांच्या दुकानांवर महापालिकेच्या पथकाने बुलडोझर चालवला.

या कारवाईदरम्यान रस्त्यावर अडथळा ठरणारी कापड विक्रीची दुकाने हटवण्यात आली, तर वर्षानुवर्षे बंद अवस्थेत असलेल्या सात टपऱ्या प्रशासनाने जप्त केल्या आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही विक्रेत्यांनी कारवाईला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.

मास्टर कॉलनीतील बाजारावर कारवाईची टांगती तलवार :
यावेळी महापालिकेच्या पथकाने मास्टर कॉलनीमध्ये भरणाऱ्या ‘बुध बाजारा’कडे विशेष लक्ष दिले. रहिवासी भागात भरणाऱ्या या बाजारामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहतुकीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याची गंभीर दखल घेत, पथकाने विक्रेत्यांना या ठिकाणी बसू नये, अशी तंबी दिली आहे. सध्या ही कारवाई केवळ ताकीद देण्यापुरती मर्यादित ठेवण्यात आली असली, तरी पुढच्या बुधवारी विक्रेत्यांनी नियमांचे उल्लंघन केल्यास, त्यांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला जाईल, असा स्पष्ट इशारा मनपाने दिला आहे.

या कारवाईबाबत बोलताना अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक संजय ठाकूर म्हणाले की, “शहरातील रस्ते रहदारीसाठी सुरक्षित करणे हे आमचे प्राधान्य आहे. अजिंठा रोडवरील कारवाई ही सुरुवात आहे. यापुढेही शहरात अतिक्रमण मुक्त मोहीम सातत्याने सुरूच राहील.” मनपाच्या या कठोर भूमिकेमुळे आता शहरातील अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.


Protected Content

Play sound