जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि अवजड वाहनांच्या बेफाम वर्दळीमुळे बांभोरी पूल व तरसोद फाटा परिसर पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करत अवजड वाहतूक शहराबाहेरील बायपास मार्गाने वळविणे आणि या भागात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची जोरदार मागणी केली आहे.
शहरातील प्रमुख वाहतूक दुवा मानल्या जाणाऱ्या बांभोरी पूल आणि तरसोद फाटा परिसरातून दररोज ट्रक, ट्रेलर आणि कंटेनरसह मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने धावत असतात. त्यामुळे या परिसरात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, नोकरदार आणि रोजंदारी करणाऱ्यांना या वाहतूक समस्येचा फटका बसत आहे.

डॉ. पाटील यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची झपाट्याने झीज होत असून रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेकदा रुग्णवाहिका व अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन सेवांनाही या वाहतूक कोंडीमुळे विलंब सहन करावा लागतो. यामुळे सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
मानराज पार्क चौकात नुकत्याच घडलेल्या भीषण अपघातात युवक ओम सुनील गिरी यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याने या प्रश्नाची तीव्रता पुन्हा अधोरेखित झाली आहे. या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली असून अवजड वाहतुकीवर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर धुळेहून येणारी अवजड वाहतूक पाळधी बायपासमार्गे आणि भुसावळकडून येणारी वाहतूक तरसोद बायपासमार्गे वळवावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. बांभोरी पूल व तरसोद फाटा या ठिकाणी शहराच्या मुख्य मार्गावरून अवजड वाहनांना प्रवेश रोखून पर्यायी मार्गाचा वापर करण्याची सूचना निवेदनातून करण्यात आली आहे.
यासोबतच या भागात नियमित वाहतूक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची आणि गर्दीच्या वेळेत विशेष वाहतूक नियंत्रण मोहीम राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
डॉ. पाटील यांनी हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि शहराच्या शाश्वत नियोजनाशी निगडीत असल्याचे अधोरेखित केले आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटना टाळणे कठीण होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर उपाय म्हणून ही मागणी महत्त्वपूर्ण मानली जात असून नागरिकांनीही या भूमिकेचे स्वागत केले आहे. आता पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यावर कितपत तातडीने पावले उचलतात, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.



