जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी २८ एप्रिल २०२६ रोजी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एका भव्य आणि धडाकेबाज ‘ऑल आऊट’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाणी आणि ३ वाहतूक शाखांच्या पथकांनी एकाच वेळी समन्वयाने कारवाई केली.
सकाळी १० ते रात्री ११ या वेळेत राबवलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातील २१ प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल २५ लाखांहून अधिक किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त केला असून, एकूण १९५ संशयित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली आहे.

या मोहिमेचे सर्वात सकारात्मक वैशिष्ट्य म्हणजे ‘मुस्कान मोहीम’. या अंतर्गत हरविलेल्या ३४ बालक आणि महिलांना सुखरूप शोधून त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले उचलत २७२ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून ४ लाख १८ हजार ६२९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाडी टाकून १३६ केसेस नोंदवण्यात आल्या आहेत, तर सायबर रिल्स बनवणाऱ्या आणि टवाळखोरांवरही पोलिसांनी वचक निर्माण केला आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



