जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील जे अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस घेण्यास वैद्यकीय कारणास्तव मुभा नाही, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पात्र डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेवून नोव्हेंबर 2021 चे वेतन अदा करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी जिल्हा कोशागार अधिकारी, जळगाव यांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘कोविड -19’ प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक आहे. किमान एक मात्रा घेतली असल्याचे प्रमाणपत्र सर्व शासकीय कार्यालयातील आहरण व सवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त करुन घेतल्यानंतरच माहे नोव्हेंबर 2021 (paid in माहे डिसेंबर2021 ) या महिन्यातील वेतन देयक अदा करावे. ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘कोविड -19’ प्रतिबंधात्मक लसीकरणाची एकही मात्रा घेतलेली नाही, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करू नये असे कळविण्यात आले होते.
तथापि, संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ लशीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यांनतर 14 दिवस झालेले आहेत, अशी कोणतीही व्यक्ती असा आहे किंवा ज्या व्यक्तीची वैद्यकिय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तिला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टरांकडील प्रमाणपत्र आहे, अशी कोणतीही व्यक्ती असा आहे किंवा 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असा असल्याचे संदर्भिय आदेश 27 नोव्हेंबर 2021 मध्ये सूचित करण्यात आलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर माहे नोव्हेंबर 2021 या महिन्याचे वेतन देयक अदा करण्यासाठी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘कोविड -19’ प्रतिबंधात्मक लसीकरण झालेले नाही, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांकरीता मान्यताप्राप्त डॉक्टराकडील प्रमाणपत्र घेवून माहे नोव्हेंबर -2021 चे वेतन देयक अदा करण्याची कार्यवाही करावी. तसे सर्व उपकोशागार अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.