विद्यापीठाच्या आदिवासी वसतीगृहातील पाणीपुरवठ्यात अपहार; चौकशीसाठी यावलला उपोषण (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील शासकीय आदिवासी वसतीगृहातील पाणी पुरवठा व देयकांमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि पाणी पुरवठादारांनी संगनमताने आदिवासीच्या निधीचा अपहार केला आहे. याची चौकशी करून आदिवासींना न्याय मिळावा यासाठी आदीवासी एकता विद्यार्थी परिषदेच्या वतीने यावल येथील आदीवासी विकास एकात्मीक प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील शासकीय आदिवासी वसतीगृहात सन २०१६ ते जानेवारी २०२ पर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतू पाणी पुरवठ्याच्या बिलांमध्ये खाडखोड केले असून बिलांवर शिक्का व स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. तसेच बिलांवर आणि बिल बुकावर नंबर हाताने टाकलेले आहेत. तसेच चार देयकांची रक्कम ही कर्मचारी गृहपाल डी.बी.पाटील यांचे नावे तर कधी कर्मचारी म्हणून तर कधी देयकात विद्यार्थी म्हणून धनादेशाद्वारे जमा केलेली दिसते. एकलव्य महिला आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटात चिंचोली यांना सन २०१८-१९ या वर्षांत टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजूरी दिलेली आहे. परंतू संबंधित पुरवठ्याचे पाणी पुरवठ्याबाबतचे प्रमाणपत्र आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी तपासणी अहवालही घेतलेला नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरचा नंबरही नाही. याप्रमाणे निधीचा अपहार केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. पंरतू अद्याप कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याने आज आदीवासी एकता विद्यार्थी परिषदेच्या वतीने यावल येथील आदीवासी विकास एकात्मीक प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल गायकवाड, जिल्हाध्यक्ष करण हरदास सोनवणे, जिल्हा सचिव यशवंत अहिरे, टंट्या भिल ब्रिगेडचे महेंद्र मोरे, कृष्णा मोरे यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे. 

Protected Content