
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संयुक्त ठिय्या आंदोलनापुढे महावितरण प्रशासनाला झुकावे लागले. शेतकऱ्यांना सलग आणि सुरळीत वीजपुरवठा देण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर वीज वितरण कंपनीकडून जळगाव ग्रामीण, चाळीसगावसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा गेल्या महिनाभरापासून वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर आज विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत आगळेवेगळे ठिय्या आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना विना खंडित सलग दहा तास वीजपुरवठा मिळालाच पाहिजे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी विद्युत कायदा २००३ च्या कलम ४३ आणि ५७ चा उल्लेख करत सुरळीत वीजपुरवठा हा शेतकऱ्यांचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या गुणवत्ता मानकांचा (SOP) भंग होत असल्याचा आरोप करत, तात्काळ वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास CGRF, विद्युत लोकपाल तसेच ग्राहक मंचात भरपाईसाठी दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेत महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यानंतर जळगाव ग्रामीण, चाळीसगाव तसेच जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना सलग ८ तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडून याबाबत लेखी पत्रही आंदोलकांना देण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद घुगे, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, एजाज मलिक, महेश बोरसे, रिंकू चौधरी, संग्राम पाटील, प्रेमराज राठोड, योगेश पाटील, डॉ. रमाकांत कदम, प्रमोद सोनवणे, स्वप्नील राजपूत, सुमित सपकाळे, संजय जाधव, वाय. एस. महाजन, हिलाल पाटील, बाळू धनगर, बाळू पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



