जळगाव प्रतिनिधी । राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या धडाडत असलेल्या प्रचार व प्रसाराच्या तोफा आज (दि.19) रोजी सायंकाळी 5 वाजेपासून थंडावणार आहेत.
विधानसभेच्या प्रचारादरम्यान सभा, फेरी, चौकसभा, सोशल मीडिया; अशा प्रत्येक माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असलेल्या महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये रंगलेला ‘धोबी पछाड’ कुस्तीचा सामना २१ ऑक्टोबर रोजी संपणार असला तरी या सामन्याचा निकाल मात्र २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहे.
जळगाव जिल्ह्यात एकूण 11 मतदार संघ असून येथे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र निर्माण सेना, बहुजन समाज पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बहुतांश ठिकाणी म्हणजे अनेक विधानसभा मतदारसंघांत महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरस असून, काही ठिकाणच्या लढती या एकतर्फी आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार फेरी काढत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. कुठे मोठ्या प्रमाणावर चौकसभा घेत मतदारांना आकर्षित करण्यात आले आहे. कुठे मोठ्या सभाही झाल्या आहेत. विशेषत: गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगावात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अदित्य नाथ यांची रावेरात सभा गाजल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पारोळा येथे सभा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी ‘बळ’ मिळाले. शुक्रवारी बहुतांशी उमेदवारांनी आपला प्रचार व प्रसारावर जोरदार भर दिला. हातात कमीतकमी वेळ असल्याने बहुतांशी उमेदवारांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. दरम्यान, आज शनिवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जाणार आहे.