मुक्ताईनगर प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथराव खडसे यांच्या उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झाली असली तरी त्यांनी येथील कार्यक्रमात आपणच मुक्ताईनगरातून निवडणूक लढविणार असल्याचे ठणकावून सांगितले.
याबाबत वृत्त असे की, आगामी विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरातून एकनाथराव खडसे यांना तिकिट मिळेल की नाही ? याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच खुद्द नाथाभाऊंनी रावेर येथील पक्षाच्या मेळाव्यात तिकिट मिळो अथवा नको, आपण निवडणूक लढवणारच अशी घोषणा केल्यामुळे याबाबत चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमिवर, मुक्ताईनगरातील त्यांच्या फार्म हाऊसवर झालेल्या बूथ प्रमुख, पेज प्रमुख तसेच विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत त्यांनी आपणच मुक्ताईनगरातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीला खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजप तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, संदीप देशमुख आदी उपस्थित होते. खडसे यांनी या प्रकरणी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. दरम्यान, या बैठकीत त्यांनी जनतेच्या कायम संपर्कात राहण्याचा सल्ला पदाधिकार्यांना दिला.