मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपण बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे जाणार असून या माध्यमातून जनहिताच्या कामांना गती देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नियोजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आजच्या महत्वाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले. ते म्हणाले की, आमच्याकडे ५० आमदार एकत्र असून आम्हाला भाजप आणि अन्य अपक्षांचा पाठींबा आहे. राज्याचा विकास हे आमचे ध्येय आहे. बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, २०१९ साली आम्ही एकत्र निवडणुका लढविल्या. याप्रसंगी नैसर्गिक युती तोडण्यात आली. याप्रसंगी आमदारांमध्ये नाराजी होती. तसेच पुढील निवडणुकीसाठी आमदारांना येणार्या अडचणी लक्षात घेऊन वेगळा मार्ग निवडण्यात आला. यात कोणताही वैयक्तीक स्वार्थ नसल्याचे त्यांनी नमूद केले. राज्याच्या हिताच्या आणि भविष्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीत निर्णय घेता येत नव्हते. हे सर्व होत असतांना ५० आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात तेव्हा त्याबाबत आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. यातूनच आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आज भाजपकडे सुमारे १२० आमदारांचे संख्याबळ असतांनाही त्यांनी मुख्यमंत्रीपद ते घेऊ शकले असते. मात्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठींबा दिला त्याबद्दल पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांचे ऋण त्यांनी व्यक्त केला. आजचे सत्तांतर ही ऐतिहासीक घटना असल्याचे त्यांनी सांगितले. जनतेची अपेक्षा पूर्ण करून राज्यात एक मजबूत सरकार मिळणार असल्याचे ते म्हणाले.