ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चाळीसगावात आंदोलन

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील ओबीसी समुदायाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी येथे भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.

येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेल्याचा आरोप केला. शेजारच्या राज्य मध्य प्रदेशात आरक्षण मिळते, परंतु आपल्या राज्यात ओबीसी आरक्षणासंदर्भातील चुकीच्या धोरणामुळे आरक्षण गेले आहे. आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगाला सरकार पैसे देवू शकले नाही, असा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य शासनावर केला.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. बी. साळुंखे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश सोनवणे, तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, ज्येष्ठ नेते उद्धव महाजन यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे संचालक, सोसायट्यांचे चेअरमन व सदस्य, सरपंच, सदस्य, विविध आघाडी मोर्चाचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, सक्रिय सदस्य उपस्थित होते.

Protected Content